आमटे फॉर्म

 

‘श्रमसंस्कार छावणी’

‘आनंदवना’तील कुष्ठरोग्यांची संख्या 1970 पर्यंत खूप वाढत गेली. प्रकल्पाला दहा वर्षें होऊन गेली होती. जो कुष्ठरोगी ‘आनंदवना’त आला, तो ‘आनंदवनात’च राहिला! कुष्ठमुक्तांचे विवाह आणि पर्यायाने परिवारवृद्धी असा सिलसिला सुरू झाला. त्यामुळेही संख्या वाढली. बाबांनी ठरवले, की कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर बनवले पाहिजे, त्यांचा प्रतिपाळ करायचा तर संस्थेकडे उत्पादन पाहिजे. शासनाकडे जमिनीची मागणी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात सोमनाथजवळील जमीन ‘महारोगी सेवा समिती’स मिळाली. त्या परिसरात सोमनाथचे प्राचीन मंदिर असल्यामुळे प्रकल्पाला सोमनाथ हे नाव रुढ झाले. तो परिसर आनंदवनापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे. ‘सोमनाथ प्रकल्पा’साठी मिळालेली जमीन डोंगरउताराची. खडकाळ. बरड. त्यात परिसरातील स्थानिक आदिवासींनी त्या जमिनीवर हक्क सांगितला. त्यासाठी मोठे आंदोलनही झाले. विनोबा भावे यांच्या मध्यस्थीमुळे त्यावर तोडगा निघाला. सुमारे सातशे एकर जमीन स्थानिक आदिवासींना दिली गेली. बाबांनी ‘आनंदवना’तील काही कुष्ठमुक्तांना सोबत घेऊन 1967 मध्ये मुक्कामासाठी ‘सोमनाथ’ला झोपडी उभारली. त्या ठिकाणी ‘श्रमसंस्कार छावणी’च्या निमित्ताने देशभरातील युवकांचा राबता वाढला. दरवर्षी विशिष्ट कालखंडात ‘सोमनाथ’ला मोठ्या संख्येने येणाऱ्या तरुणाईने शेतीयोग्य जमिनीसाठी जंगल साफ करणे, तलाव खोदणे, विहिरी खणणे, लहान बंधारे बांधणे अशी अनेक मूलभूत कामे करण्याचा सपाटा लावला. ‘सोमनाथ’मध्ये ‘आनंदवन’ निर्माण होऊ लागले! सुमारे तीनशे एकर नांगरटीखाली आणली गेलेली शेती बहरु लागली!