विहीरीवरील स्लँब कोसळल्याने ग्राम पंचायत मजुराचा मृत्यु

0
112

    मूल (प्रतिनिधी)
नदी काठावर बांधलेल्या नळ योजनेच्या विहिरीचा स्लॅंब कोसळल्याने पुंडलीक मराठे या मजुराचा विहिरीत पडून मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील केळझर येथे आज सकाळी घडली. मूल तालुक्यातील केळझर येथेे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने १९८०-८१ मध्यें गांवापासून अडीच कि.मी.अंतरावर असलेल्या अंधारी नदी काठावर नळाद्वारे गांवात पाणी पुरवठा करण्यासाठी ५० फुट खोल विहिरीचे बांधकाम केले. नळ योजनेकरीता बांधण्यांत आलेल्या विहिर आणि त्यावरील स्लॅबची जिर्ण होण्याची कालमर्यादा जवळपास ३५ वर्षे पर्यंत असते. कालमर्यादा झाल्यानंतर जिर्णावस्थेत आलेल्या विहिरी आणि त्यावरील स्लॅबचे मजबुतीकरण करणे किंवा नव्याने विहिरीचे बांधकाम करण्याची जबाबदारी ही ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि संबंधीत ग्राम पंचायतीची असते. आज क्षतीग्रस्त झालेली केळझर येथील विहिर बांधकाम नियमानुसार पाच ते सहा वर्षापूर्वीच निर्लेखनास पात्र होती. त्यामूळे पाणी पुरवठा विभाग आणि ग्राम पंचायतीने सदर विहिर बंद करून अथवा त्यावरील जिर्णावस्थेत आलेल्या स्लॅबचे मजबुतीकरण करावयास पाहिजे होते. परंतू संबंधीत विभाग आणि ग्राम पंचायतीने सदर विहिरीच्या बांधकामा कडे दुर्लक्ष केल्याने ग्राम पंचायत मध्यें रोजंदारी वर काम करणारा पुंडलीक मराठे (२५) या मजुराला जीव गमवावा लागला. पाण्याच्या टाकीवरील नादुरूस्त मोटार पंप दुरूस्त करून मृतक पुंडलीक मराठे मिस्त्री रमेश मंडल व सहका-यांसह आज सकाळी सदर विहिरीवर गेला, मोटार पंप लावत असतांना अचानक विहिरीवरील जीर्ण झालेला स्लॅब कोसळला. त्यामूळे स्लॅबवर उभा असलेला पुंडलीक मराठे ५० फुट खोल विहिरीत पडून मृत्यु पावला. दरम्यान घटनेची माहिती होताच सरपंच काजु खोब्रागडे आणि ग्राम पंचायत सदस्यांनी घटनास्थळ धाव घेतली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच प्रभारी तहसिलार यशवंत पवार, संवर्ग विकास अधिकारी डाॅ. मयुर कळसे आणि ठाणेदार सतिशसिंह राजपुत हे ही घटनास्थळी हजर झाले. मृतक पुंडलीक मराठे याचे पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मूल असल्याने ग्रामस्थांनी मृतकाच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यानुसार ग्राम पंचायतीने मृतकाच्या पत्नीला 1 लाखाची आर्थिक मदत आणि पद रिक्त झाल्यानंतर मृतकाच्या पत्नीला ग्राम पंचायत सेवेत सामावुन घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेत प्रशासनाला सहकार्य केले. घटनेची पोलीस स्टेशन मूल येथे नोंद घेण्यात आली असून पुढील तपास करण्यांत येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here